जालना : पद्मविभूषण उस्ताद राशीद खाँ साहेब यांचे पट्टशिष्य पं. नागेश आडगावकर यांच्या अप्रतिम व भावपूर्ण गायकीने ‘माणिक मोती’ संगीतोत्सवात सुरांची अविस्मरणीय मैफल रंगली. अभंगवाणी, नाट्यसंगीत आणि रागदारी संगीताच्या त्रिवेणी संगमाने जालनेकर रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कै. माणिकराव शंकरराव अग्निहोत्री (सेवलीकर) यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी रविवारी सायंकाळी जेईएस महाविद्यालयाच्या चुन्नीलाल जी. गोयल सभागृहात या भव्य संगीतोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. विनायक सेवलीकर यांनी केली.
कार्यक्रमाची सुरुवात पं. नागेश आडगावकर यांनी ‘राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी’ या नामघोषाने केली. त्यानंतर ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’, ‘समाधी साधन संजीवन नाम’, ‘पाहू द्या रे मज विठोबाचे मुख’ आणि ‘घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे’ या अभंगांच्या भावपूर्ण सादरीकरणातून त्यांनी रसिकांना विठ्ठलभक्तीत तल्लीन केले. त्यांच्या प्रभावी स्वरविस्तार आणि हरकतींनी प्रत्येक रचनेला विशेष उंची प्राप्त करून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी उगले यांनी केले, तर डॉ. सुजाता देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड, उपाध्यक्ष फुलचंद भक्कड, उद्योजक सुनील रायठठ्ठा, प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, डॉ. विनायक सेवलीकर, संजय परळीकर, सुभाष कुलकर्णी, अरविंद देशपांडे, नितीन देशमुख, सौ. किरण देशपांडे, विनायक कुलकर्णी, शाहीर आप्पासाहेब उगले, डॉ. यशवंत सोनुने, प्रा. कल्याण उगले यांच्यासह शहरातील संगीतप्रेमी व रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभंगवाणीनंतर त्यांनी ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ हे लोकप्रिय नाट्यगीत शास्त्रीय ढंगात सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. तसेच ‘एकच रे मागणी तुझ्या पायी देवा’, ‘समयासी सादर व्हावे’, ‘धरुनीया पदराला ओढू नको रे नंदलाला’ आणि ‘बाळ सगुण गुणाचे तान्हे, बाळ दिसते गोजिरवाणे ग’ या विविध भावछटा उलगडणाऱ्या रचनांनी सभागृहात भावपूर्ण वातावरण निर्माण केले. मैफिलीचा समारोप पं. आडगावकर यांनी ‘आज राधा ब्रिज को चली’ या भैरवीने केला. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला. या सुरेल मैफिलीत रोहित खवले (पखवाज), वेदांत कुलकर्णी (तबला), डॉ. प्रसाद चौधरी (संवादिनी), पंकज शिरभाते (व्हायोलिन) आणि निरंजन भालेराव (बासुरी) यांनी अप्रतिम साथसंगत करून कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली.