भोकरदन- शासन निर्णयाची होळी करून शिवसेनेचे आंदोलन

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी

Jalna Nayak    29-Sep-2026
Total Views |
 
भोकरदन तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी करण्यात आली.
 
भोकरदन- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना ठोस आर्थिक मदत देण्याऐवजी केवळ कागदोपत्री निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करत भोकरदन तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी करण्यात आली. जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 
यंदा पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकर्‍यांच्या हातून उत्पादन गेले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने प्रत्यक्ष आर्थिक मदत देणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी पंचनाम्याची अट न ठेवता सरसकट हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्यावे, पुढील हंगामात पेरणी करण्याची आर्थिक क्षमता नसलेल्या शेतकर्‍यांना स्वतंत्र मदत द्यावी, जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर सुरू करावीत, अशा मागण्या करण्यात आल्या. ‘कागदावरील सवलती नकोत, शेतकर्‍यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत द्या’, अशी भूमिका घेत आंदोलकांनी शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने ठोस आर्थिक मदत न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात तालुकाप्रमुख सुभाष राऊत, महेश पुरोहित, अर्जुन ठोंबरे, दिनकर जामुंदे, राहुल कोथळकर, दशरथ सरोदे, संदीप लाड, नागेश कोठाले, समाधान गायकवाड, कृष्णा तराल, अण्णा सुरडकर, रामभाऊ कुदर,संदीप क्षिरसागर, जगदीश शावकार, शेख खालेद, फारुख पठाण, दादाराव बावसकर, आबा पाटील, कैलास ढमाले, प्रसाद जानोकार, कृष्णा बेराड, संतोष सुरडकर, प्रदीप पैठणकर, आनंदा दौड, रावसाहेब साबळे, सुनील गिरणारे यांच्यासह शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.