जालना : कै.डॉ. सुभाषराव ढाकणे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जालना संचलित डॉ. सुभाषराव ढाकणे महाविद्यालय, माऊली प्राशासकीय सेवा वरिष्ठ महाविद्यालय, जालना आणि अक्षरवैभव साहित्य परिषद, शाखा जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय अक्षरवैभव साहित्य संमेलनातील गझल मुशायऱ्याने जालनेकरांची साहित्यिक संध्या चांगलीच रंगून गेली.
संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर बहारदार गझल मुशायऱ्यालाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या गझल मुशायऱ्याचे अध्यक्षस्थान लातूर येथील गझलकार योगिराज माने यांनी भूषविले. यावेळी डॉ. इकबाल मिन्ने, सुधीर मुळीक, डॉ. शुभांगी कुलकर्णी, अविनाश कासांडे, राजू आठवले, राना दौंड, यशवंत म्हस्के, आत्माराम जाधव, गिरीश जोशी, आत्तम गेंदे आणि डॉ. राज रणधीर आदी गझलकारांनी आपल्या दर्जेदार गझलांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रेमभावनेपासून विरहाच्या वेदनेपर्यंत आणि सामाजिक वास्तवापासून मानवी स्वभावाच्या विविध पैलूंपर्यंत अनेक विषयांना गझलकारांनी आपल्या शेरांतून प्रभावीपणे अभिव्यक्त केले.
डॉ. स्वाती भद्रे यांनी
'असा ना एकदा वा दोनदा तो सारखा होतो,
तुला पाहून का माझा गुलाबी चेहरा होतो”
या शेरातून प्रेमभावनेची नाजूक अनुभूती व्यक्त केली.
डॉ. शुभांगी कुलकर्णी यांच्या
'मनाची पानगळ झाल्यावरी हमखास आठवतो
मला सोडून गेलेला तुझा मधुमास आठवतो'
या शेरातून विरह आणि आठवणींची हळवी किनार जाणवली.
आत्माराम जाधव यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना
'बर्फ गोळा मला खूप पोळायचा
माय जेव्हा जुनी नोट मोडायची'
या शेरातून आईच्या कष्टांचे आणि जुन्या आठवणींचे भावविश्व उभे केले.
गिरीश जोशी यांचा
'गुलाबी गुलाबी हवा होत आहे
तुझ्या आठवांचा थवा होत आहे'
हा शेर प्रेम आणि स्मरणरंजनाची अनुभूती देऊन गेला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ममता सिंधुताई सपकाळ यांच्या
'कसा धरू मी नेम तुझ्यावर
अजून आहे प्रेम तुझ्यावर'
या ओळींना रसिकांची उस्फूर्त दाद मिळाली आणि वंस मोअर वंस करून रसिकांनी अक्षरशः संमेलनस्थळ दणाणून सोडला.
सामाजिक वास्तवावर भाष्य करताना सुधीर मुळीक यांनी
'या सर्कशीत बसलो हरवून चेहरा मी
नंतर दिला जगाने दर्जा विदूषकाचा'
असा आशयपूर्ण शेर सादर केला.
जात-धर्माच्या भिंतींवर भाष्य करताना राजू आठवले यांनी 'भिंत ना तोडू शकलो आम्ही जातीधर्माची
मी मग झालो दुसऱ्याचा अन् तीही दुसऱ्याची'
असा संवेदनशील शेर मांडला.
राना दौंड यांनी जीवनाच्या अंतिम सत्याकडे निर्देश करणारा
'जगतो आहे बदलून नवे रोजच कपडे
तुला जायचे येथून आहे फक्त नागडे'
हा शेर सादर केला.
व्यवस्थेवरील उपरोधिक भाष्य करत यशवंत म्हस्के यांनी
'व्यवस्थेच्या कुटनीतीला निखळ समजले जावे
फतवा काढा नव्यापिढीला झुरळ समजले जावे'
असा परखड शेर ऐकविला.
अविनाश कासांडे यांच्या
'तिच्या आठवांचा असा पूर येतो
हळूवार होती असा सूर येतो'
या शेरातून आठवणींची हळुवार अनुभूती उमटली.
आत्तम गेंदे यांनी आपल्या खास उपरोधिक शैलीत
'इकडून तिकडे लुडबुड करतो आहे चमचा
पातेल्यावर हक्क सांगतो आहे चमचा'
असा राजकीय-सामाजिक आशयाचा शेर सादर केला.
मुशायऱ्याचे अध्यक्ष असलेल्या योगिराज माने यांचा
'जे हवे ते सर्वकाही मिळत नाही
नेमके हे माणसाला कळत नाही'
हा जीवनाचे वास्तव सांगणारा शेर ठरला.
डॉ. इकबाल मिन्ने यांनी
'वेळ दिलेली पाळत जाणे सोपे नसते
पंढरपूरला चालत जाणे सोपे नसते'
या शेरातून अनुभव आणि जीवनप्रवासाचे संदर्भ मांडले.
तर डॉ. राज रणधीर यांच्या
'तुला जी पाहिजे आहे तुला मिळणार नाही ती
तुला मिळणार आहे जी तुला रुचणार नाही ती'
या शेराने मानवी अपेक्षा आणि वास्तव यातील अंतर अधोरेखित केले.
जवळपास प्रत्येक शेराला आणि गझलकाराला रसिक उस्फूर्त दाद देत गेले .गझलेच्या माध्यमातून प्रेम, वेदना, आठवणी, सामाजिक विसंगती आणि जीवनवास्तव यांचे दर्शन घडवत गझलकारांनी जालन्याच्या साहित्यिक वातावरणात एक वेगळीच रंगत निर्माण केली . डॉ राज रणधीर यांच्या उस्फूर्त आणि प्रासंगिक सूत्रसंचालनाने मुशायरा रंगला. या कार्यक्रमास साहित्यिक, कवी, गझलकार, शिक्षक, विद्यार्थी तसेच साहित्यप्रेमी रसिकांची मोठी उपस्थिती होती.