जालनाः शिष्टमंडळाची शिष्टाई निष्फळ, जरांगे उपोषणावर ठाम

11 तारखेपर्यंत मागण्या मान्य करा अन्यथा 12 तारखेला मुंबईत येणार

Jalna Nayak    03-Sep-2026
Total Views |
 
चर्चा करण्यासाठी वेळ वाढवून देतो परंतु मागण्या मान्य कराव्याच लागतील
 
जालनाः मराठा समाजाला कुणबीप्रमाणपत्रे तसेच इतर मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबतची चर्चा फिस्कटली असून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपले उपोषण सुरूच राहील असा पावित्रा मनोज जरांगे यांनी घेतल्याने शिष्टमंडळाची शिष्टाई निष्फळ ठरली. गुरूवारी रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू असलेल्या चर्चेला यश आले नाही. 11 तारखेपर्यंत सर्व मागण्या मान्य करा अन्यथा बारा तारखेला आम्ही मुंबईत धडकणार असा इशाराही जरांगे यांनी शिष्टमंडळाला यावेळी दिला. चर्चा करण्यासाठी वेळ वाढवून देतो परंतु मागण्या मान्य कराव्याच लागतील असे जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले.
गुरूवारी सायंकाळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री मकरंद पाटील, आ. प्रसाद लाड, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आदींचे शिष्टमंडळ अंतरवालीत दाखल झाले होते. दोन तासांच्या चर्चेनंतरही मार्ग निघू शकला नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिल्यानंतरही जरांगे उपोषणावर ठाम आहेत. आतापर्यंत असलेल्या सर्व मागण्या मान्यही झाल्या आहेत. मात्र जरांगे यांनी अपेक्षित मागण्या मान्य न झाल्याने त्यांचे उपोषण कायम ठेवले. अंतरवाली सराटीत हजारो मराठा बांधव तळ ठोकून आहेत.