घनसावंगी - तालुक्यातील जिरडगाव शिवारात हॉटेलमालकाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. रांजणी ते कुंभार पिंपळगाव रस्त्यावरील कंडारी परतूर फाट्याजवळील पॉवर हाऊस परिसरात हा प्रकार घडला. नामदेव अंजीराम पाईकराव (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पाईकराव यांचे कंडारी परतूर फाट्यावर हॉटेल आहे. सकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. मृतदेहाची माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली.प्राथमिक माहितीनुसार, पाईकराव यांच्या अंगावर, पोटावर तसेच पाठीवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.घटनेची माहिती मिळताच घनसावंगी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनासाठी घनसावंगी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे खुनाचा उलगडा करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. खुनाचे कारण आणि आरोपींबाबत पोलिस तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.