विद्यार्थ्यांच्या संशोधनातून विकसित भारताची पायाभरणी

जिल्हास्तरीय आविष्कार नवोपक्रम स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५ महाविद्यालयांतील १३३ विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प

Jalna Nayak    30-Sep-2026
Total Views |

श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय, जालना
 
जालना - विकसित भारताचे २०४७ मधील स्वप्न साकार करण्याची मोठी जबाबदारी आजच्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे संशोधन, नवोपक्रम आणि विविध ज्ञानशाखांमध्ये काम करण्याच्या संधी विद्यार्थ्यांसाठी खुल्या झाल्या आहेत. या संधींचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात आपला ठसा उमटवावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. भास्कर साठे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार नवोपक्रम स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष महेंद्रकुमार गुप्ता होते. जिल्ह्यातील २५ महाविद्यालयांमधील १८० विद्यार्थ्यांनी विविध प्रकारांत नोंदणी केली होती. त्यापैकी १३३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक उपयुक्तता आणि विविध ज्ञानशाखांशी संबंधित अभिनव संकल्पना विद्यार्थ्यांनी परीक्षकांसमोर मांडल्या.  विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य व प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांनी आविष्कार स्पर्धेमागील भूमिका स्पष्ट करताना विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती रुजविण्यासाठी अशा व्यासपीठांचे महत्त्व अधोरेखित केले. उद्योजक जितेंद्र राठी यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पनांना उद्योग क्षेत्राने पाठबळ देण्याची गरज व्यक्त केली. डॉ. प्रसाद मदन यांनी संशोधन व नवोपक्रमाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात महेंद्रकुमार गुप्ता यांनी विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांच्या आहारी न जाता वेळेचा उपयोग ज्ञान, संशोधन आणि कौशल्यविकासासाठी करावा, असे सांगितले. प्रभारी प्राचार्य डॉ. जितेंद्र अहिरराव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विद्या पटवारी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पूजा कक्कड अरोरा यांनी स्पर्धेचे नियोजन व उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. अंजु कुलकर्णी व डॉ. अंकिता सेन यांनी केले. प्रा. अशोक गारकर यांनी आभार मानले. विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक व महाविद्यालयीन प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.