भोकरदन : ई-पॉस मशीनच्या सर्व्हरमधील वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणी, मार्जिनची रक्कम वेळेवर न मिळणे यासह विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे राज्याध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील यांनी तातडीने हस्तक्षेप केला.
पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी (दि. ४) भोकरदन तालुका स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक डोळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी त्यांनी दुकानदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
बैठकीत ई-पॉस मशीनच्या सर्व्हरमधील तांत्रिक समस्या, मार्जिन वेळेवर न मिळणे तसेच अन्य प्रलंबित प्रश्न दुकानदारांनी मांडले. जालना जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथराव थोटे यांनी जाफराबाद, अंबड आणि घनसावंगी तालुक्यांतील दुकानदारांचे मार्जिन प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले.
यावर डोळसे पाटील यांनी तातडीने मंत्रालयाशी संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. थकीत मार्जिनची रक्कम दुकानदारांच्या खात्यावर जमा करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर संबंधित दुकानदारांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचे सांगण्यात आले.
शासनाकडे प्रश्नांचा पाठपुरावा करणार
स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित समस्या शासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे डोळसे पाटील यांनी स्पष्ट केले. शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी दुकानदारांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीस जिल्हाध्यक्ष जगन्नाथराव थोटे, तालुकाध्यक्ष विश्वासराव गाडे, तालुका सचिव कैसरसेठ, उपसचिव राजू भालेराव यांच्यासह तालुक्यातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.