जालना : शिक्षक क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदान करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जालना जिल्ह्यातील पाच शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारीया यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत जिल्हा निवड समितीने प्राप्त 30 शिक्षकांच्या प्रस्तावांची छाननी करून सन 2026 च्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पाच शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या शासन परिपत्रक दिनांक 12 डिसेंबर 2000 अन्वये शिक्षक क्षेत्रात उत्कृष्ट, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यानुसार यंदाच्या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पात्र शिक्षकांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांमधून जिल्हा निवड समितीने विविध निकषांच्या आधारे पाच शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.
जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांमध्ये श्री. कैलास मधुकर चौथे, प्राथमिक शिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा, देवगाव म.कें., गेवराई बाजार, ता. बदनापूर, श्री. सचिन रामदास खिल्लारे, सहशिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा, लालवाडी तांडा, ता. अंबड, श्री. विजय बाबाराव कांगणे, प्राथमिक पदवीधर शिक्षक, जि. प. उच्च प्राथमिक शाळा, दुधा, ता. मंठा, श्री. पेन्टू विठ्ठल मैसनवाड, सहशिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा, दहिफळ भो., पूर्व, ता. परतूर तसेच डॉ. दत्तात्रय मनोहर सपकाळ, माध्यमिक शिक्षक, जि. प. प्रशाला, धावडा, ता. भोकरदन, यांचा समावेश आहे.
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न, शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले उपक्रम, नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग तसेच समाजाभिमुख आणि उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेऊन शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. जिल्ह्यातील शिक्षकांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव व्हावा, या उद्देशाने हा पुरस्कार महत्त्वपूर्ण मानला जातो.
***