जालना- आभासी चलन BLSS व VDTT मध्ये मोठ्या परताव्याचे आमिष; आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी

₹4.30 कोटींच्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी फरार वकील गजाआड

Jalna Nayak    04-Sep-2026
Total Views |

₹4.30 कोटींच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी फरार आरोपी रमेश बाबुराव उत्तेकर याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.
 
जालना - आभासी चलनात मोठ्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ₹4 कोटी 30 लाख 66 हजार 795 रुपयांची गुंतवणूक करून घेत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. रमेश बाबुराव उत्तेकर (वय 54, रा. हरिओम पुरम सोसायटी, औंधगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी व्यवसायाने वकील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी 18 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या तक्रारीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 441/2025 दाखल करण्यात आला होता. अमोद वसंत म्हेतर, इरफान सय्यद मोयोद्दीन, व्यंकटेश दशरथ भोई, रमेश उत्तेकर, अजय गायकवाड आणि शर्वरी अमोद म्हेतर यांच्याविरुद्ध कलम 420, 406, 409, 120(ब) भादंवि तसेच MPID कायद्याच्या कलम 3, 4 व 5 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेल्या BLSS आणि VDTT या आभासी चलनांमध्ये मोठ्या आर्थिक लाभाचे आमिष दाखवून फिर्यादी, त्यांचे नातेवाईक तसेच मित्रपरिवारातील व्यक्तींना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतवून घेतल्यानंतर आरोपी फरार झाले.या आरोपींविरुद्ध यापूर्वीही जालना तालुका पोलीस ठाण्यात GDCC (क्रिप्टो करन्सी) प्रकरणात गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच इचलकरंजी (कोल्हापूर), ठाणे, राबोडी आणि बागलकोट (कर्नाटक) येथेही संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रमेश उत्तेकर याचा ठावठिकाणा शोधला. वरिष्ठांच्या परवानगीने पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने 3 सप्टेंबर 2026 रोजी रमेश उत्तेकर याला अटक केली. अटक केलेल्या आरोपीला विशेष MPID न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी (PCR) मंजूर केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
ही कारवाई जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक शैलेष म्हस्के तसेच गोकुळसिंग कायटे, किरण चव्हाण, समाधान तेलंग्रे, अंबादास साबळे, विष्णू कोरडे, ज्ञानोबा खुणे, श्रेयश वाघमारे, महिला अंमलदार जयश्री निकम आणि मंदा नाटकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.