जालना: विद्यार्थ्यांमध्ये मानवता, संवेदनशीलता, परस्पर प्रेम, सहकार्य, सामाजिक बांधिलकी आणि चांगले संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने जालना जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘हीच आमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे’ हे प्रार्थना गीत नियमितपणे गायिले जात आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील 2 हजार 361शाळांमधील 3 लाख 46 हजार 340 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
जिल्ह्यात जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच विविध व्यवस्थापनांच्या एकूण 2 हजार 444 शाळा आहेत. त्यापैकी 2 हजार 361 शाळांमध्ये हे प्रार्थना गीत विद्यार्थ्यांकडून सामूहिकरित्या गायिले जात आहे. जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी संख्या 3 लाख 76 हजार 294 असून, त्यापैकी सुमारे 92 टक्के विद्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमाचा संदेश पोहोचला आहे.
प्रार्थनेतून मूल्यशिक्षणावर भर
‘हीच आमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे’ या गीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात माणुसकी, बंधुभाव, प्रेम, सहकार्य, संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यांसारख्या मूल्यांची रुजवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शालेय जीवनात मिळालेले संस्कार विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने पुस्तकी ज्ञानासोबतच मूल्याधारित आणि संस्कारक्षम शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे.
दररोज सकाळी शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांकडून हे गीत सामूहिकरित्या गायिले जाते. त्यामुळे शालेय वातावरणात सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होत असून, गीतातील मानवतावादी विचार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी शिक्षकांकडूनही विविध उपक्रम राबविले जात आहेत.विद्यार्थ्यांनी एकमेकांना मदत करणे, गरजू मित्रांना सहकार्य करणे, स्वच्छता राखणे, ज्येष्ठांचा सन्मान करणे, निसर्गाची काळजी घेणे तसेच समाजातील सर्व घटकांशी प्रेमाने व आदराने वागणे, या मूल्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांपर्यंतही हा उपक्रम प्रभावीपणे पोहोचविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, उत्तम संस्कार आणि सामाजिक जाणीव देण्यासाठी भविष्यातही विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संगिता भागवत यांनी सांगितले. तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बाळासाहेब खरात यांनीही या उपक्रमातील विद्यार्थ्यांच्या सहभागाची माहिती दिली.