जालन्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतुकीवर कारवाई

12 गुन्ह्यांत 6 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त

Jalna Nayak    08-Sep-2026
Total Views |

एकूण 6 लाख 65 हजार 149 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
 
जालना: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जालना पथकाने जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री तसेच वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवून 12 गुन्हे दाखल केले असून, एकूण 6 लाख 65 हजार 149 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. 6 ते 7 सप्टेंबर 2026 दरम्यान ही कारवाई करण्यात आली. दोन दिवसांच्या या मोहिमेत अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये चापडगाव, घणसावंगी, माळी, पाळवाडी, परतूर, भोरखेडा, देवखेडा, भोकरदन, धोत्रेखेड, देवगाव, माहोरा, बदनापूर, कैकाडी मोहल्ला, वाडीवाडी तांडा, सावखेडा, हॉटेल साई दरबार, एमआयडीसी जालना, जाधव ढाबा, दूधना फाटा, अंबड-केदारनगर, बदनापूर तसेच मयूर पान सेंटर आदी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर आज (दि.8) रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक व दुय्यम निरीक्षकांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी मित्तल यांनी जिल्ह्यातील अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच अवैध मद्यनिर्मिती व विक्रीची ठिकाणे शोधून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, तसेच मद्याची अवैध वाहतूक करणारे आणि अवैधरित्या मद्य बाळगाणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.