जालना महामार्गावर थरार! ४५ प्रवाशांची बस रस्त्याखाली घसरली

पोलिसांच्या वाहनाला धडक

Jalna Nayak    08-Sep-2026
Total Views |

चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस महामार्गाच्या खाली घसरली.
बदनापूर (जि. जालना) : जालना–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास थरारक अपघात झाला. अमरावतीहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी एसटी बस दावलवाडी शिवारातील महिको सीड कंपनीसमोर रस्त्याच्या खाली घसरली. त्यानंतर बसने पंचनामा करण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या DYSP अनंत कुलकर्णी यांच्या शासकीय वाहनाला पाठीमागून धडक दिली.मिळालेल्या माहितीनुसार, बससमोर अचानक वाहन आल्याने चालकाने जोरात ब्रेक दाबून बस डावीकडे वळवली. मात्र, बसचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस महामार्गाच्या खाली घसरली.
४५ प्रवासी सुखरूप
सुदैवाने बस उलटली नाही. बसच्या मागील बाजूस असलेल्या आपत्कालीन दरवाजातून स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील सुमारे ४० ते ४५ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेत प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
पंचनामा करणारे चौघे जखमी
अपघातावेळी रस्त्याच्या कडेला एका गुन्ह्याचा पंचनामा सुरू होता. बसची शासकीय वाहनाला झालेल्या धडकेत दोन पोलीस कर्मचारी आणि दोन पंच जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.