मंठा (जालना): दुष्काळ, कर्जमाफी, अवाढव्य वीज बिलं, खतांची दरवाढ आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी आज मंठा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रशासनाला जाब विचारत एक भव्य बैलगाडी शेतकरी मोर्चा काढण्यात आला. सकाळी ठीक १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. पारंपरिक बैलगाड्या, हातात काँग्रेस पक्षाचे झेंडे आणि शासनाविरोधी घोषणाबाजी करत शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरल्याने मंठा शहरात एकच गदारोळ उडाला होता.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला हा भव्य मोर्चा घोषणाबाजी करत थेट तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, माजी आमदार धोंडिराम राठोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे, माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि मंठा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह अन्य महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात उत्साहाने सहभागी झाले होते. मोर्चाच्या शेवटी विविध मागण्यांचे विस्तृत निवेदन मंठा तहसीलदारांना सादर करण्यात आले असून, लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी नेत्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
मोर्चातील शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजार रुपये दुष्काळ भरपाई सरसकट तात्काळ देण्यात यावी, सर्व शेतकऱ्यांना कोणतीही अट न ठेवता सरसकट कर्जमाफी मिळावी आणि नवीन शेतकऱ्यांना पुनर्गठन करून सरसकट पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली. तसेच ग्रामीण भागातील वीज लोडशेडिंग तात्काळ बंद करावी आणि महावितरणने बसवलेल्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य जनता अवाढव्य बिलांमुळे त्रस्त झाली असून ही दरवाढ व बिलवसुली ताबडतोब थांबवावी, असा सूर आंदोलकांकडून लावून धरण्यात आला.
मंठा तालुक्यातील केंधळी, देवठाणा, हतवन, अवलगाव, विडोळी, वाकडी, बरबडा, आकणी, लिंबे वडगाव आणि पाटोदा या गावांमधील शेतकऱ्यांचे मोटार पंप व विद्युत केबलच्या तारा गेल्या तीन महिन्यांपासून चोरीला गेल्या आहेत. मात्र, वारंवार तक्रारी करूनही या मोटारपंपांचा आणि चोरांचा अद्यापही शोध लागलेला नाही, याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत या चोरीच्या घटनांचा तात्काळ छडा लावण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, लाडक्या बहीण योजनेतील अपात्र राहिलेल्या पात्र महिलांना या योजनेत सामावून घेण्यात यावे, निराधारांचे थकीत वेतन तात्काळ देण्यात यावे आणि घरकुलांचे थकीत हप्ते त्वरित वर्ग करण्यात यावेत, असे मुद्देही मोर्चानिमित्त उपस्थित करण्यात आले.
महागाईच्या मुद्द्यावरही सरकारला धारेवर धरण्यात आले. साखर, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डिझेल आणि पेट्रोल यांच्या वाढलेल्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून ही दरवाढ त्वरित कमी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. शेती क्षेत्राबाबत बोलताना, खतांच्या व औषधांच्या प्रचंड वाढलेल्या किमती कमी कराव्यात आणि बोगस खते व औषधे विकून शेतकऱ्यांची सुरू असलेली खुली लूट तात्काळ बंद करावी, असे ठणकावून सांगण्यात आले. सोयाबीनला प्रतिक्विंटल ९ हजार रुपये आणि कापसाला प्रतिक्विंटल १५ हजार रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे, अशी आक्रमक मागणी शेतकऱ्यांनी केली.
ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणीही लावून धरण्यात आली. घरकुलांच्या संदर्भात बोलताना, ग्रामीण भागातील घरकुलांसाठी ३ लाख रुपये तर शहरी भागातील घरकुलांसाठी ७ लाख रुपये अनुदान देण्यात यावे, तसेच सिमेंट, वाळू आणि विटांच्या प्रचंड महागाईमुळे २०२४ ते २०२६ या काळातील अपूर्ण राहिलेली आणि बंद पडलेली घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी १ लाख रुपयांचे अतिरिक्त अनुदान त्वरित दिले जावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच २०२३ ते २०२६ या कालावधीत समाजकल्याण विभागात अनेक प्रस्ताव धूळ खात पडलेले असून त्यांना लवकरात लवकर मान्यता देण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले.