भोकरदन : आगामी गणेशोत्सव व पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी भोकरदन पोलिसांच्या वतीने मंगळवारी (दि. ८) श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गणेशोत्सवात डीजे व डॉल्बीचा वापर टाळून डीजेमुक्त मिरवणुका काढाव्यात, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन काटेकर यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना केले.
बैठकीस उपविभागीय अधिकारी कार्तिक पाणीग्रही, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन काटेकर, नायब तहसीलदार अविनाश पाटील, नगरपरिषदेचे दामोधर गाडेकर, महावितरणचे शरद चेतक, सार्वजनिक बांधकाम विभाग व बीएसएनएलचे अधिकारी, शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, पोलिस पाटील, पत्रकार तसेच व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन काटेकर व सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल बांगर यांनी गणेशोत्सव आणि पोळा सण शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले. गणेश मंडळांनी मंडप परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड.हर्षकुमार जाधव, माजी उपनगराध्यक्ष शब्बीर कुरैशी, नगरसेवक शफीक पठाण, चंद्रकांत पगारे, सोनार फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन हिवरकर, व्यापारी महासंघाचे सचिव योगेश शर्मा, भाजपाचे ज्येष्ठनेते सुरेश शर्मा, ओके चिने, राजेंद्र देशमुख, सतीश रोकडे, शंकर सपकाळ, रमेश बिरसोने, शेख रिजवान, पत्रकार संघाचे अध्यक्ष सांडू नामदे, पत्रकार सुरेश बनकर, गणेश औटी, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विष्णू गाढे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळण्यावर भर
गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डीजे, डॉल्बी अथवा मोठ्या आवाजाच्या ध्वनीक्षेपकांचा वापर करू नये. ध्वनी प्रदूषण नियमनाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच उंच किंवा आक्षेपार्ह स्वरूपाचे देखावे उभारू नयेत आणि कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे कृत्य होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले. उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सर्व गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.