लखन तुरे हत्या प्रकरणातील दोन आरोपी चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात

घाणेवाडी परिसरात मध्यरात्री कारवाई; चौकशीत हत्येची कबुली

Jalna Nayak    08-Sep-2026
Total Views |

दनझिरा पोलिसांनी दोन आरोपींना घाणेवाडी परिसरातून अटक केली
 
जालना : जालना शहरातील ढवळेश्वर परिसरात 4 सप्टेंबर रोजी लखन छगनलाल तुरे यांच्या हत्येप्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी दोन आरोपींना घाणेवाडी परिसरातून अटक केली आहे. दरम्यान, आरोपींना 13 सप्टेंबरपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
मृतक छगनलाल तुरे (वय 38) यांना पैशाच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून लाठ्या-काठ्या व सिमेंटच्या गट्टूने मारहाण करण्यात आली होती. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना 7 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.घटनेनंतर आरोपी शुभम काकासाहेब जोगदंड आणि किशोर देविदास जोगदंड हे फरार झाले होते. पोलिसांनी तपासाची दोन पथके तयार करून नाशिक जिल्ह्यातील येवला, इगतपुरी, सिन्नर, अहिल्यानगर, संगमनेर, शिर्डी तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, पाचोड, बीड आणि जालना जिल्ह्यातील अंबड आदी ठिकाणी शोध घेतला.दरम्यान, आरोपी घाणेवाडी परिसरातील एका मोसंबीच्या शेतात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी तुरे यांचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात यापूर्वी नवनाथ देविदास जोगदंड आणि राहुल प्रल्हाद कंठाळे यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे व त्यांच्या पथकाने केली.